---Advertisement---
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्यासाठी सुमारे १ हजार ३०० बेड क्षमतेचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष मंजू वारुंगसे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार दर्शन पथ मार्गावरील देवस्थान ट्रस्टच्या कायमस्वरूपी जागेत हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच कुंभमेळा २०२७ साठी येत्या ऑक्टोबर महिन्यात ध्वज स्थापना होणार असून, त्याआधी सर्व विकासकामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील रस्ते विकास, वीज केबल्स भूमिगत करणे आणि शहर सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
कुंभमेळ्याच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या व्यापारी व दुकानदारांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आणि शहरासाठी नवीन जिल्हा परिषद शाळेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
एकूणच, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले असून भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.









