---Advertisement---
जळगाव : चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील एसटी महामंडळाची बस सेवा बंद आहे. या गावातील विद्यार्थ्यांना खराब रस्ते आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज ५-६ किलोमीटर पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. या पायी प्रवासाने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्वरित कुंड्यापाणीपर्यंत बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
कुंड्यापाणी ते बिडगाव रस्त्यावर पावसाने मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडेझुडपांमुळे बस चालकांना अडचणींचा सामना करीत बस चालवावी लागते. यामुळे बस बिडगाव येथून पुढे जात नाही, अशी माहिती बस चालकांनी दिली आहे. अनेकदा बसच्या काचा फुटल्याने नुकसान भरपाई द्यावी लागते, असेही चालकांनी सांगितले.
---Advertisement---
सातपुड्याच्या पायथ्याशी कुंड्यापाणी हे गाव वसलेले आहे. या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी पायपीट करत शाळेत जातात. विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू न शकल्याने त्यांच्या शिक्षणावरही याचा दुष्परिणाम होत असल्याची व्यथा पालकांनी मांडली. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील मुसा तडवी यांनी विद्यार्थ्यंचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे बस फेऱ्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी कुंड्यापाणी येथे दिवसांतून कमीत कमी एसटी बसच्या दोन फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे. बस फेऱ्या सुरु झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्यांना शाळेत जाताना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.