---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद शिवारात भूसंपादन प्रक्रियेत तब्बल १६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी नाशिक येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नशिराबाद शिवारात भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणासाठी सन २०११ व २०१३ मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. या अंतर्गत गट क्रमांक २२०६ मधील प्लॉट क्रमांक ३ व ४ अशी एकूण ४८८ चौरस मीटर जागा संपादित करण्यात आली होती.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा प्रत्यक्षात पुष्पा देवराम जावळे (रा. जळगाव) यांच्या मालकीची असताना, आरोपी महिलेने स्वतःला त्यांचीच ओळख देत बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडले. शासनाकडून भूसंपादन मोबदल्यापोटी देण्यात आलेली १६,९७,३२६ रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतली, असे निष्पन्न झाले आहे.
बँक दस्तऐवज, भूसंपादन कार्यालयातील नोंदी, छायाचित्रे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेली आरोपी महिला नाशिक येथील रहिवाशी असून त्या महिलेचे नाव सुनंदा मोतीलाल पाटील (वय ५९) आहे.
आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.









