Crime News: घरगुती सिलेंडर साठवणुकीवर एलसीबीचा छापा, चौघे अटकेत

जळगाव : घरगुती सिलिंडरमधून गॅसचा वाहनात भरणा करण्याच्या उद्देशाने साठवणूक केलेले ११ घरगुती सिलिंडर्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले. ही कारवाई पथकाने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंप्राळा-हुडको येथे केली. या कारवाईतून अजूनही घरगुती सिलिंडरचा वापर करीत वाहनांत गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

पिंप्राळा परिसरात वाहनामध्ये घरगुती सिलिंडरमधून काही व्यक्ती गॅस भरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत शोधमोहीम हाती घेतली. वसीम चंगा शहा (रा. वखार, पिंप्राळा), अकलाख खान जहांगीर खान (रा. ख्वाजानगर, पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (रा. पिंप्राळा-हुडको), जुबेर खान उस्मान खान पठाण (रा. हुडको) यांनी घरगुती सिलिंडरची साठवणूक केल्याचे या मोहिमेतून समोर आले. संशयितांकडून ११ सिलिंडर्स, पाच गॅस भरण्यासाठी वापरातील मोटारी, दोन वजन काटे, असा सुमारे दोन लाख एक हजाराचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. चारही संशयितांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे साहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, पोलीस वाहनचालक भरत पाटील, तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, हवालदार जितेंद्र राठोड, इरफान मलिक यांनी ही कारवाई केली.