---Advertisement---
उत्तम काळे
Liquor License : जळगावसह जिल्ह्यात परवाना काढून ‘लिमिट’ मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. अनेक जण परवाना न काढताही मद्यप्राशन करतात. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल कमी मिळतो. जिल्ह्यात पाच महिन्यांत अवघ्या १०५ तळीरामांनी मद्य पिण्याचा परवाना काढल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे दुकानदारही विनापरवानाधारकांना मद्यविक्री करतांना दिसून येत आहे. दारू पिण्यासाठी जिल्ह्यात परवाना काढणाऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान पाच महिन्यांत केवळ १०५ जणांनी दारूसेवनाचे परवाने काढले आहेत. याशिवाय वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्याही खूपच कमी आहे. दारू खरेदी करणाऱ्यांपैकी ९९ टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो.
परवाना काढल्यावरही अटींचे पालन व्हावे
परवाना मिळाल्यानंतर, ज्या परवान्यासाठी अर्ज केला आहे, त्यासंबंधित सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. परवान्याची वैधता संपण्यापूर्वी, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर परवान्याच्या अर्टीमध्ये काही बदल झाले, तर ते बदल स्वीकारणे आणि त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.
कोणाकडून दिला जातो मद्य परवाना ?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. तेथे सर्व्हिसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. तुम्हाला कुठला परवाना पाहिजे, ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. डिजिटल फोटो आणि सही, ओळखपत्र (आधार कार्ड, व्होटर आयडी), रहिवासी दाखला आवश्यक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
मद्य परवानाधारकांनाही सवलत
मद्य परवानाधारकांना खरेदी-विक्री करताना काही सवलती मिळतात. तसे पाहता जिल्ह्यात दारू खरेदी करणाऱ्या ९९ टक्के लोकांकडे परवाना नसतोच.
परवाना नसल्यास कारवाई
महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. एक दिवसाचा ५ रुपये, वर्षाचा १०० रुपये, तर आजीवन १००० रुपयांमध्ये परवाना मिळतो. परवाना नसल्यास कारवाई होऊ शकते. पहिल्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. वर्षभर दारू पिण्याचा परवाना काढण्यासाठी लागतात १०५ रुपये, तर आजीवन परवाना काढण्यासाठी एक हजार पाच रुपये लागत असल्याची माहिती जळगाव येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
असे आहे परवान्यासाठी शुल्क
एक वर्षासाठी १०० रुपये शुल्क अधिक अर्ज शुल्क पाच रुपये: एकूण १०५ रुपये. आजीवनसाठी १००० रुपये शुल्क व अर्ज शुल्क पाच रुपये: एकूण १००५ रुपये.
किती वर्षांवरील व्यक्तींना मिळतो परवाना
वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहे. दारू पिण्यासाठी कायदेशीर वय २५ वर्षे आहे. याचा अर्थ असा की, २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच दारू पिण्याचा परवाना मिळतो. वयाची २१ वर्षे पूर्ण केली असतील, तर बिअर किंवा ब्रिझरचे सेवन करण्याचा परवाना मिळतो.