---Advertisement---
जळगाव शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मेस चालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने घरगुतीसोबतच व्यावसायिक गॅसही वेळेवर उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम मेस व्यवसायावर होत असून अनेक ठिकाणी डबे पुरवणे थांबवावे लागत आहे. परिणामी, मेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांपुढे उपासमारीची वेळ येत आहे.
शासनाने गॅस टंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जिल्हा पातळीवर विशेष पथके नेमून वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी कायम आहेत. प्राधान्यक्रमानुसार पुरवठा केला जात असला तरी सामान्य नागरिक आणि लहान व्यावसायिकांना त्याचा पुरेसा लाभ मिळताना दिसत नाही.
गॅस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील हॉस्टेल, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना डबे पुरवणारे मेस चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी नवीन ग्राहक घेणे बंद केले असून काहींना तर मेस बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे वास्तव्य असल्याने जेवणाची गरज मोठी आहे. अशातच गॅस सिलेंडरचा काळाबाजार वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाढीव दराने सिलेंडर खरेदी करणे परवडत नसल्याने मेस चालक आणि नागरिक दोघेही त्रस्त झाले आहेत.
केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली असून तो ९१२.५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर व्यावसायिक सिलेंडरची किंमतही १८३५ रुपयांवर गेली आहे. अधिकृत दरांपेक्षा काळाबाजारात यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असल्याचेही समोर आले आहे.
एकीकडे शासनाकडून रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे, मात्र पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.









