---Advertisement---
जिल्ह्यात पशुधनावर विशेषतः गोवंशीय पशुधनावर लम्पी साथरोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एरंडोल, पारोळा धरणगाव आदी तालुका परिसरात लम्पी चर्मरोगाची लागण झाली असून जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
सद्यस्थितीत जिल्हा पशुसंवर्धन विभागाला लम्पी प्रतिबंधात्मक ४ लाख १० हजार ८०० लस मात्रा प्राप्त झाली असून ३ लाख ८५ हजार ४७१ पशुधनाचे लसीकरण सुमारे ९४ टक्के पूर्ण झाले असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षात मान्सूनकाळात लम्पी प्रादूर्भाव झालेला आहे. २०२२-२३ मध्ये रावेर तालुक्यात लम्पी प्रादूर्भावामुळे शेकडो पशुधन दगावले होते. दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून तालुकापातळीवरून लम्पी साथरोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम देखील राबविण्यात आली होती.
गुरांचे बाजार, वाहतुकीसह उत्सवांवर होते निबंध
जळगाव जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव इतर पशुधनावर होऊ नये, यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यासह पोळा सण उत्सवादरम्यान गुरांचे बाजार, पशुधन विक्रीसह गुरांची वाहतुकीवर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अमन मित्तल यांनी शासन निर्देशानुसार निर्बंध असल्याचे आदेशही दिले होते.
७३१ पशुधनाचा मृत्यूः पशुमालकांना दीड कोटींचे मदत अनुदान
२०२२-२३ दरम्यान जिल्ह्यात रावेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी तालुक्यात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे २३ हजाराहून अधिक पशुधन बाधीत झाले होते. त्यामुळे ५ कि.मी परिघात बाधीत क्षेत्र घोषीत करीत लसीकरण मोहीम राबविली होती. उपचारांअंती २० हजार १८० पशुधन पूर्णतः बरे झाले होते. तर ७३१ पशुधनाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचे निदान अहवाल राज्य
शासनाकडे पाठविण्यात आला होता. यानुसार जिल्ह्यातील पशुधन मालकांना ७३१ मृत पशुधनाचे १ कोटी ६० लाख रूपये नुकसान अनुदान मदत डीबीटी व्दारे देण्यात आली होती.
लम्पीची लक्षणे
लम्पी हा आजार कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. विषाणू वाहक डास, माश्या, चिलटे तसेच बाधित जनावरांच्या संपर्कामुळे पसरतो. पशुधनाला १०४-१०५ अंश ताप, पायांवर सूज, अंगभर गाठी, भूक मंदावणे, दूध उत्पादन घटणे आणि डोळे नाकातून स्त्राव होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
उपाययोजना
पशुधनाला लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बाधीत पशुधनाला तत्काळ विलगीकरण करीत पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. जनावरांचे आहार आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी वैरण, खनिज मिश्रण यांसारख्या पौष्टिक गोष्टींवर भर द्यावा. मात्र विद्यापीठाच्या संशोधनानुसार ८० टक्के सेवा-शुश्रूषा व २० टक्के औषधोपचार हाच लम्पीवरील प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची स्वच्छता, आहार, जैव सुरक्षेच्या उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कीटकनाशकांचा वापर याकडे विशेष लक्ष द्यावे.
सद्यस्थितीत पारोळा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यात प्रादुर्भाव
जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव पारोळा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यांमध्ये काही प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून शेतकरी पशुपालक व दुग्धोत्पादकांना पशुधनाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लसीकरण आणि स्वच्छतेवर भर ग्रामपंचायतींना निर्देश
पशुपालकांना आपल्या गोठ्यातील जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा. लम्पी प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर गोवर्गीय जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे. गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे, ग्रामपंचायतींनी गावातील जनावरांच्या गोठ्यांमध्ये फवारणी मोहीम राबवण्याच्याही सूचना पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जाणार आहेत. लसीकरण केवळ निरोगी पशुधनाचे करावे. मृत पशुधन आठ फूट खोल चुना टाकून पुरावे. बाधित गार्थीच्या वासरांना थेट सडावाटे दूध पाजणे टाळावे.
डॉ. प्रदीप झोड, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय