---Advertisement---
महानगरपालिकेतील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले यांची नियुक्ती अवैध ठरवत, मनपा आयुक्तांनी ३० मार्च रोजी त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश जारी केले आहेत. तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या या नियुक्त प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि शैक्षणिक अर्हता पूर्ण नसल्याचे ताशेरे या आदेशात ओढण्यात आले आहेत.
डॉ. उगले यांची १९ मे १९९३ रोजी तत्कालीन नगरपालिकेत कुटुंब कल्याण केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती. मूळ पदासाठी एमबीबीएस ही शैक्षणिक पात्रता आवश्यक होती, मात्र डॉ. उगले या ही अर्हता धारण करत नसल्याचे प्रशासकीय तपासात समोर आले आहे. तर आरोग्य सेवा पुणे येथील अतिरिक्त संचालकांनी १९९६ मध्येच ही नियुक्ती अवैध असल्याचे पत्राद्वारे कळवले होते. २०१२ मध्ये महासभा ठरावानुसार सेवा नियमित करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यासाठी असलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता आजतागायत झालेली नाही.
ही नियुक्ती करताना जाहिरात देणे, विभागीय निवड मंडळाची मान्यता घेणे किंवा आरक्षणाचे नियम पाळणे यांपैकी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. २०१३ पासून या पदाचे शासन अनुदानही बंद झाले असून, हे पद मनपाच्या मंजूर आस्थापनेवर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयुक्तांचा कठोर निर्णय
महानगरपालिकेच्या विशेष लेखापरीक्षण अहवालातही या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आले होते. डॉ. उगले या केवळ अस्थायी कर्मचारी असल्याचे सिद्ध होत असल्याने, सामान्य प्रशासन विभागाच्या १२ ऑक्टोबर १९९३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आयुक्तांनी त्यांना ३० मार्च पासून सेवेतून मुक्त केले आहे.








