राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

---Advertisement---

 

23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असून विधान परिषदेत मंत्री आशिष जैस्वाल अर्थसंकल्प सादर करतील.
या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत आहेत.

हे मुद्दे ठरणार केंद्रस्थानी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक संवेदनशील विषयांवर चर्चा रंगण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्यांक संस्थांना प्रमाणपत्र वाटप, मुलुंड येथील मेट्रो दुर्घटना, मंत्र्यांच्या दालनात उघड झाल्याचा कथित लाचखोरी प्रकार, तसेच सरकारने मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय या मुद्द्यांवर विरोधक सभागृहात सरकारला धारेवर धरणार आहेत.
याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अपयश, महापौर निवडणूक, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत निर्माण झालेला अंतर्गत कलह या विषयांवरही जोरदार चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही कसोटी लागणार आहे.

अजित पवारांची उणीव जाणवणार
या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. गेली साडेतीन दशके त्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ठसा उमटवला होता. त्यांनी तब्बल अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत.
अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार असून त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येईल. विविध पक्षांचे आमदार त्यांच्या आठवणींना उजाळा देतील. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सभागृहाला औपचारिक परिचय करून दिला जाणार आहे.
एकूणच, राजकीय आरोप-प्रत्यारोप, भावनिक वातावरण आणि महत्त्वाच्या निर्णयांची पार्श्वभूमी अशा तिहेरी छायेत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---