---Advertisement---
मुंबई : राज्यातील तब्बल 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रभाग रचनेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. शुक्रवारपासून या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार असून अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरपर्यंत संपणार आहे. काही ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आले असून त्यांची मुदतही डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील सुधारित तरतुदीनुसार (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 22, 2022) हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रभाग रचनेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर
20 फेब्रुवारीपर्यंत: तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशे सुपरइम्पोज करून गावनिहाय नकाशे अंतिम करणे.
27 फेब्रुवारीपर्यंत: तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग सीमा निश्चित करणे.
5 मार्चपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी.
11 मार्चपर्यंत प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.
17 मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविणे.
23 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता किंवा आवश्यक दुरुस्ती.
30 मार्चपर्यंत समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांनंतर अंतिम प्रारूप निश्चित.
4 मे अंतिम प्रभाग रचना जाहीर.
दिवाळीत मतदानाची शक्यता
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती व आक्षेप मागवून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पावसाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुका दिवाळीच्या सुमारास होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यातील ग्रामीण राजकारणासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून येत्या काही महिन्यांत राजकीय हालचालींना आता वेग येणार.









