सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात दर्जा व गुणवत्ता राखा – मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे निर्देश

---Advertisement---

 

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक 2026 पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा आणि गुणवत्ता राखत ती गतीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.


या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राधान्यक्रमातील सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी त्रयस्थ पक्षाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार असून, प्राधिकरणानेही स्वतंत्र गुणवत्ता पडताळणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


मंजुरी मिळालेली व कोणतीही अडचण नसलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. वन व जलसंपदा विभागांनी रस्त्यांसाठी आवश्यक परवानग्या त्वरित द्याव्यात, तसेच ठेकेदारांनी ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत, अन्यथा विलंब झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे सुशोभीकरण करताना भाविकांच्या सोयीचा विचार करावा. दिशादर्शक फलकांचे आकार एकसमान ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.


बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामे, आवश्यक परवानग्या, भूसंपादन व सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली. यानंतर मंत्री भोसले यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणीही केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---