---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. यात हातभट्टी दारूधाडसत्रात १३४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. बुधवारी (९ जुलै) रोजी एकाच दिवशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवले.
---Advertisement---
या धाडसत्रादरम्यान एकूण १३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात दारू, कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये एकूण ३ हजार ३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २० हजार १५० लिटर रसायन (कच्चा माल) आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १४ लाख ४८ हजार ६६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत पोलिस विभागाने ९९ गुन्ह्यांची नोंद केली असून, २ हजार ८४५ लिटर दारू आणि ५ हजार ६३० लिटर रसायन जप्त केले. या कारवाईची अंदाजित किंमत ६ लाख १२ हजार ३८२ इतकी आहे.
त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्ह्यांची नोंद घेतली आहे. त्यांच्या कारवाईत ५४० लिटर दारु १४ हजार ५२० लिटर रसायन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याची एकूण किंमत ८ लाख ३६ हजार २८० रुपये इतकी आहे.