---Advertisement---
राज्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली असून राज्यभरातील 81 शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करण्यात आली असून राज्य मंडळाने याबाबत कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्र क्रमांक 224 येथे बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आला होता.
तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील केंद्र क्रमांक 0079 येथे सामूहिक कॉपी होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या प्रकरणात पर्यवेक्षक व केंद्र संचालकांसह काही जणांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील काही केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त पाच शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एका केंद्रावर राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट तसेच चिट वापरून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तीन शिक्षक व एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर अधिक कडक करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.









