---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील कासोदा परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास ताडे, आडगाव, निपाणे आणि नांदखुर्द बु. या भागांमध्ये एकाचवेळी छापे टाकण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी नियोजन करत चार स्वतंत्र पथके तयार केली होती. या पथकांनी समन्वय साधत पहाटेच्या वेळी कारवाई करून अवैध अड्ड्यांवर धाड टाकली.
या कारवाईदरम्यान सुमारे १२०० लिटर रसायन व तयार दारू जागेवरच नष्ट करण्यात आली. तसेच हातभट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि दारू असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच रामकृष्ण पाटील, नंदलाल परदेशी, किरण गाडीलोहार, अकिल मुजावर, योगेश पाटील, लहु हटकर, कुणाल देवरे आणि सोनु पाचुंदे यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासन ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवत असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.









