---Advertisement---
जामनेर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहर अतिक्रमणमुक्त व स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने जामनेर नगर परिषदच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शिवसृष्टी ते गांधी चौक व शिवसृष्टी ते भीमसृष्टी हे मार्ग “नो हॉकर क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आले असून, याबाबतची माहिती भाजी विक्रेते व हातगाडी धारकांच्या बैठकीत देण्यात आली.
नगर परिषद जामनेर सभागृहात आयोजित या बैठकीत नगर परिषद मुख्याधिकारी श्री. नितीन बागुल यांनी उपस्थित विक्रेत्यांना कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. नो हॉकर क्षेत्रात हातगाड्या लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई, दंड व शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस सन्माननीय उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगर परिषद सदस्य, अधिकारी व मोठ्या संख्येने भाजी विक्रेते व हातगाडी धारक उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे यांनी मार्गदर्शन करताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमणमुक्त जामनेर आवश्यक असल्याचे नमूद केले. सर्व हातगाडी धारकांनी नियमांचे पालन करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नगर परिषद जामनेरच्या या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध जामनेर घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे नियम पाळा – अतिक्रमणमुक्त जामनेर घडवा, स्वच्छ व सुंदर शहरासाठी सहकार्य करा
असं आवाहन जामनेर नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.









