---Advertisement---
यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत मंगळसूत्र चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एकाच वेळी पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे आणि पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान घडली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंदाकिनी मुकेश गजरे या त्यांच्या सोबत असलेल्या राखी सुरवाडे, रूपाली कोळी, रोहिणी जाधव आणि स्वाती वराडे यांच्यासह मुंजोबा यात्रेसाठी गेल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी अज्ञात आरोपीने संधी साधत या पाचही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले.
या चोरीत एकूण सुमारे 56 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर यात्रेतील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुल करत आहेत.
दरम्यान, यात्रेच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी अधिक सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.









