---Advertisement---
“मराठी राजभाषा गौरव दिन” निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ येथे कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीत’ गायनाने उत्साहात झाली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. मराठी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या फेट्यांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून त्यांच्या आनंदात भर घालण्यात आली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शाळा क्रमांक ३२ मधील सुमारे ९५ टक्के विद्यार्थी मुस्लिम समाजातील असूनही ते आवडीने आणि अभिमानाने मराठी भाषेचे शिक्षण घेत आहेत. हिंदी भाषिक पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थ्यांनी मराठीप्रती असलेली ओढ आणि प्रेम व्यक्त केले. “मराठी ही केवळ राजभाषा नसून संवाद आणि संस्कृतीची भाषा आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे म्हणाले, “मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जिथे अमराठी भाषिक विद्यार्थी मराठी शिकत आहेत, तिथे त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे.”
आगामी काळात जळगाव महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसेतर्फे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप बांगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास श्रीकृष्ण बाविस्कर, श्रीमती मीनाक्षी बदर, तुषार चौधरी, संदीप रोकडे यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता. तसेच मनसेचे महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, विभागाध्यक्ष आशुतोष जाधव, खुशाल ठाकूर, दीपक राठोड, विकास पाथरे, ऋषिकेश मेंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकृष्ण मेंगडे यांनी केले.









