जळगाव : येथील नेरी नाका जवळील एसटी वर्कशॉप समोरील दुकानांना अचानक आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही आग आज बुधवार, ९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लागली. आगीत या दुकानांच्या बाहेर लावलेल्या चारचाकी वाहनाचे नुकसान झाल्याचे आढळून आले. आग लागण्याचे कारण कळाले नसून शनिपेठ पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे.
शेख साबीर इस्लाम (वय ४५, रा. सालार नगर) यांचे कुशन व रेक्झीनचे गोडावून आहे. या गोडावूनला अचानक आग लागली. यासोबतच त्यांच्या बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना यांच्या ऑटो गॅरेज दुकान आणि अशोक गुलाब महाजन यांच्या चहाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले.
या आगीत दुकानांच्या बाहेर लावलेल्या कार (एमएच ०४ इएच ७०१४) जळाल्याने तिचे नुकसान झाले. दरम्यान या ठिकाणी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, गिरीश खडके, वाहनचालक देविदास सुरवाडे, इकबाल तडवी, महेश पाटील, भगवान पाटील, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, फायरमन भाग्यश्री बाविस्कर, विजय पाटील, मनोज पाटील, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, पन्नालाल सोनवणे, योगेश कोल्हे, नंदकिशोर खडके, निवांत इंगळे, संजय भोईटे, संतोष तायडे, भारत छापरिया यांनी परिश्रम घेतले.