जळगाव : गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका राज्यात वाढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये दोन नवीन रुग्ण दिसले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये गुलेंन बॅरेल सिंड्रोम (GBS) या आजारावर चर्चा केली गेली. या बैठकीस जळगाव शहरातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गुलेंन बॅरेल सिंड्रोमच्या लक्षणांवर, त्याच्या पसरण्याच्या मार्गावर, संभव्य चाचण्यांवर आणि उपचार पद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान, जळगाव शहरात या आजाराचा एक ही रुग्ण आढळून आला नसल्याचे दवाखाना विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
GBS च्या लक्षणांबद्दल माहिती: रुग्णांना श्वास घेण्यास अडचण येणे, हाता पायाला मुंगा येणे, अचानक लुळेपणा येणे, चक्कर येणे, कमजोरी, डायरीया (जास्त दिवसांचा), श्वसनाद्वारे किंवा दुषित अन्न आणि पाण्याच्या संपर्कातून होणारा संसर्ग आणि शारीरिक कमतरता या सर्व प्रमुख लक्षणांचा समावेश आहे.
सध्याची स्थिती: सद्यस्थितीत जळगाव शहरात GBS चा एकही रुग्ण आढळलेला नाही. यावर वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आजार सौम्य प्रकाराचा असून त्यावर योग्य काळजी घेतल्यास उपचार योग्य ठरू शकतात.
जनजागृती आणि काळजीचे उपाय: या बैठकीत नागरिकांना या आजारापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या आहेत:
पाणी उकडून प्यावे.
अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देणे.
शिजलेले आणि न शिजलेले अन्न एकत्र ठेवू नये.
जर कोणत्याही लक्षणांचा अनुभव घेतला तर जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरित संपर्क साधावा.
यांनी घेतला बैठकीत सहभाग
बैठकीस जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त अश्विनी गायकवाड, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी आणि डॉ. विजय घोलप यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आणि योग्य तपासणी व उपचारांनी या आजारावर नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.
संपूर्ण जळगाव शहरातील नागरिकांनी या सूचना आणि उपाययोजनांचे पालन करून आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.