---Advertisement---
जळगाव : पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील 17.70 किलोमीटर लांबीच्या शहरबाह्य (बायपास) रस्त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज रविवारी (६ जुलै) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह केली. हे काम अंतिम टप्प्यात असून, रस्ता पूर्णपणे खुला होण्यासाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितले की, खोटेनगर ते पाळधी या रस्त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बायपास पूर्ण होताच या कामाची सुरुवात केली जाईल.
---Advertisement---
बायपास मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज, लघुपुल आणि गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. यामध्ये प्रशासन विशेष लक्ष देऊन कामाची गती वाढवत आहे. हा बायपास पूर्ण झाल्यानंतर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक शहराबाहेर बायपासवर वळवली जाईल आणि शहरात वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 17.70 किलोमीटर लांबीच्या या बायपास अंतर्गत 25 नवीन कल्वर्ट्सपैकी 24 पूर्ण झाले आहेत. उर्वरित एक प्रगतीपथावर आहे. 10 पैकी 9 लघुपुल पूर्ण झाले आहेत. 4 अंडरपासेसचे काम पूर्ण झाले असून मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन रेल्वे ओव्हरब्रिजपैकी एकाचे काम सुरू असून दुसऱ्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.