वसुबारसच्या मुहूर्तावर आमदार भोळे दाखल करणार अर्ज

जळगाव : महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांचा समावेश आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २२ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतांश उमेदवार मुहूर्ताची निवड करत असतात. कालाष्टमी आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आज गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील , मंत्री अनिल भाईदास पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आदी नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबतच विविध पक्षातील उमेदवार देखील मुहूर्तावर आपला उमेवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, जळगाव शहर मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हे वसुबारसच्या मुहूर्तावर सोमवार, २८ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे महायुतीचे अमोल जावळे हे देखील वसूबारसच्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार भोळे हे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते सकाळी ११ वाजता अर्ज दाखल कारणात आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना भारतीय जनता पक्षाचे तसेच महायुतीचे घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत. आ. भोळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा मंत्री ना. गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मंत्री ना. महाजन हे अमोल जावळे व आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना उपस्थित राहणार आहेत.