---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना शुक्रवारी (१ ऑगस्ट ) रोजी देण्यात आले.
हरीविठ्ठल नगर परिसरात गटारींचा अभाव आहे. यामुळे येथील रहिवाश्याना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हरीविठ्ठल नगर परिसरात काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यांची कामे पार पडलेली असली तरीदेखील त्या ठिकाणी आवश्यक त्या गटारींचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर व घरांवर पडणारे पाणी वाहून जाण्याऐवजी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे हरीविठ्ठल नगर परिसरात तात्काळ गटारीचे काम सुरू करुन पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी.
तसेच हरिविठ्ठल नगर परिसरात मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. हा परिसर झपाट्याने विस्तारित असून येथे रहिवाश्यांची संख्या पाहता येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नाही. विशेषतः हरीविठ्ठल नगर रिक्षा स्टॉप परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना अत्यंत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महिलांसाठी ही परिस्थिती आणखीनच अडचणीची व असुरक्षित आहे. तरी, सदर ठिकाणी तात्काळ मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता १० दिवसात करावी अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शैलीने आपल्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार ,महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, ॲड. सागर शिंपी, संजय मोती, तसेच हरी विठ्ठल नगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.