---Advertisement---
अमळनेर : शहरात एका घरा समोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्याने लांबविल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीनुसार एकास अटक केली असून त्याच्याकडील मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव विजय भाईदास भील (वय १९, रा. एकरुखी ता.अमळनेर) असे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील राजेंद्र रतनलाल वर्मा (रा. प्रताप मिल कंपाऊंड) हे गुरुवारी (३१ जुलै ) रोजी दुपारी जेवणासाठी घरी आले होते. त्यांनी त्याची दुचाकी घरा समोरच हॅण्डल लॉक करून लावली होती. ते घरातून बाहेर आल्यावर त्यांना त्यांची मोटरसायकल दिसून आली नाही. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अमळनेर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथकातील पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वात पोलिस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, विनोद भोई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, उदय बोरसे आदींच्या पथकाला चोरटा शोधण्याचे आदेश व सूचना दिल्या होत्या.
पथकाने प्रताप मिल कंपाऊंड परिसर व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विजय भाईदास भील (वय १९, रा. एकरुखी ता.अमळनेर) याने मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला एकरूखी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यास पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली. त्याला सदर चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही चोरी करून डुबकी मारुती मंदिर परिसरातील डाझुडपांमध्ये लपवल्याची कबुली दिली. तेथून ती जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.