जळगाव : शहरात गुन्हेगारीचे मूळ असलेल्या व धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनसिंग उर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय 34, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याला एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज) कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जेनसिंगचा विरोधात जळगावसह विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खंडणीसाठी मारहाण, खूनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन यांसह सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा दोन जातीय तणावाच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग उघडकीस आला आहे. सीआरपीसी 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. खंडेराव नगर पुल, बुधवार बाजार परिसरात नागरिकांना धमकावणे तसेच जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये त्याचा हात होता.
एमपीडीए अंतर्गत कारवाई
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली जेनसिंगच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जेनसिंगला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
सहभागी अधिकारी
कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, संजय सपकाळे, इरफान मलिक, सुनील दामोदरे, सुशील चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.