मनपाचे 1452 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर; उत्पन्नवाढीवर विशेष भर

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे सुमारे 1452 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी झालेल्या सभेत सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या शिलकीसह अंदाजपत्रक मांडले. या अंदाजपत्रकाचा स्थायी समितीकडून सविस्तर अभ्यास केला जाणार असून त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

मनपा निवडणुकीनंतर झालेली ही स्थायी समितीची पहिलीच सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे-गायकवाड तसेच नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी आयुक्त ढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.

यानंतर आयुक्त ढेरे यांनी सन 2025-26 चे सुधारीत व 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक सभापतींकडे सुपूर्द केले. अंदाजपत्रकातील विविध तरतुदी, जमा-खर्च आणि आर्थिक नियोजनाबाबत त्यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केले.

मालमत्ता करापासून सन 2025-26 मध्ये सुमारे 118 कोटी रुपयांचे सुधारित उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून वार्षिक भाडेमूल्य निर्धारणाचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात सुमारे 5 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर सन 2026-27 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 124 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच प्रभाग समिती क्रमांक 3 व 4 च्या जीर्ण कार्यालयांच्या जागी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी संकुलातील गाळे, जाहिरात फलक व बॅनर स्ट्रक्चर उभारणीद्वारे अतिरिक्त महसूल मिळवण्याचेही नियोजन आहे. मनपा मालकीच्या जागांवर सुमारे 92 ठिकाणी जाहिरात स्ट्रक्चर उभारून त्यासाठी अभिकर्ता नेमण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील व्यावसायिकांकडून व्यवसाय परवाना व लायसन्स फी आकारून मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याची कार्यवाही सुरू आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून दिव्यांग कल्याणासाठीही मागील वर्षातील शिल्लक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, जळगाव शहरासाठी ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी प्राथमिक टप्प्यात शहरातील बसमार्ग निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

या बैठकीस नगरसेवक नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, नितीन सपके, मानसी भोईटे, कल्पेश सोनवणे, सुरेश सोनवणे, वंदना इंगळे, अरविंद देशमुख, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे, सागर सोनवणे, ॲड. दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील व इब्राहिम पटेल आदी सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---