जळगाव : नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेकजण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पंतगाला असलेल्या नॉयलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होण्याचे प्रकार घडत असतात. शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे. तरी देखील त्याची सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरात नायलॉन मांजाची विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. मनपा पथकाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या शहरातील तिघांवर मंगळवार १४ रोजी दंडात्मक कारवाई केली. तिघा विक्रेत्यांकडून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यात कुसुंबा येथील गुरूदत्त कॉलनीतील उत्तम रामकृष्ण भोई तसेच अयोध्या नगरातील हनुमान नगर परिसरातील प्रतिभा दिलीप पोळ, मनीष आदिनाथ सांगवे यांच्याकडून प्रत्येकी ५ प्लास्टिक मांजा रील प्रमाणे २० प्लास्टिक मांजा रिल जप्त करून ५ हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आले. असे एकूण १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.आहे.
ही कारवाई महानगर पालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, मनोज राठोड, रुपेश भालेराव, नंदू गायकवाड, नितीन जावळे यांनी कारवाई केली.