---Advertisement---
जळगाव शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. रविवारी गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले, ज्यामध्ये तब्बल २२ टन कचरा संकलित करण्यात आला.
या मोहिमेत महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः उपस्थित राहून पाहणी केली आणि थेट रस्त्यावर उतरून कारवाई केली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला स्वच्छतेचा प्रश्न या मोहिमेमुळे मार्गी लागल्याचे दिसून आले.
सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४५३ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी ट्रॅक्टर, पिकअप आणि डंपर यांसारख्या यंत्रणांचा वापर करण्यात आला.


अभियानादरम्यान, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर महापौरांनी थेट कारवाई केली. खराब फळे आणि कचरा फेकणाऱ्यांना तो स्वतः उचलून कचराकुंडीत टाकण्यास भाग पाडण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करत पिशव्या जप्त करण्यात आल्या.
महापौरांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, येत्या काही दिवसांतही प्लास्टिकचा वापर सुरू ठेवल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानासमोरील स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी बजावले.
---Advertisement---
या मोहिमेत स्थानिक पदाधिकारी, स्वच्छता अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.









