---Advertisement---
रामनाथी (गोवा), दि. २५ मार्च : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिसंवादाला देशभरातील नामांकित कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २२ आणि २३ मार्च रोजी फोंडा, गोवा येथे हा परिसंवाद पार पडला.
या परिसंवादामध्ये ‘कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती ईश्वरप्राप्तीचे प्रभावी माध्यम आहे’, हा मूलभूत विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला. भावी पिढीला कलेतून अध्यात्माची दिशा देणे आणि त्यासाठी कृतीशील उपाय शोधणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
ज्येष्ठ बासरीवादक पू. पं. केशव गिंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संगीतातून साधना करण्याची संकल्पना अत्यंत योग्य असून, या उद्देशाने प्रस्तावित विश्वविद्यालय लवकरात लवकर साकार व्हावे.” त्यांनी परिसंवादाच्या शेवटी ‘पांचजन्य वेणू’ या बासरीवर भजन सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
परिसंवादात संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मांडलेल्या ‘संगीतातून साधना’ या संकल्पनेचे सविस्तर विवेचन करण्यात आले. संगीत समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी भारतीय संगीतावरील संशोधन आणि सूक्ष्म अंगांचे विश्लेषण उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी “अनेक वर्षांनी सर्व कलाकार एकत्र आले असून, कलेची अंतिम पायरी अध्यात्मच आहे,” असे मत व्यक्त केले. नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी संगीत आणि अध्यात्म यांचा संगम देशावर सकारात्मक परिणाम घडवू शकतो, असे सांगितले.
पं. निषाद बाक्रे यांनी “कलेला आध्यात्मिक दृष्टीकोन देणारी चळवळ येथून सुरू होईल,” असे मत मांडले. पं. चंद्रशेखर वझे यांनी “महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय भविष्यात मार्गदर्शक ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच सौ. ज्योती शिधये यांनी “हा परिसंवाद कृतीशील ठरला असून, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे,” असे नमूद केले.
या परिसंवादात पुणे, मुंबई, ठाणे आणि गोवा येथील अनेक प्रथितयश कलाकार आणि तज्ञ सहभागी झाले होते.









