---Advertisement---
शिर्डी : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे वळण आले असून, प्रतिमा चाकणकर या शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रूपाली चाकणकर यांच्या बहिण असून, या प्रकरणात त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. प्रतिमा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या चार बँक खात्यांमधून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या व्यवहारांचा स्त्रोत आणि स्वरूप याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अशोक खरात हा समता पतसंस्थेतील सुमारे १०० खात्यांवर नॉमिनी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतील ३२ खात्यांवरही त्याचे नॉमिनी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान, समता पतसंस्थेत १०० हून अधिक संशयास्पद खाती आढळून आली असून, सुमारे ५७ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर ही खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून ६० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ३३ खातेदारांची चौकशी पूर्ण झाली असून, अनेकांनी आपल्या नावावर खाते असल्याची माहिती नसल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणात काळा पैसा पांढरा केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आर्थिक गैरव्यवहारांची साखळी उलगडण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाकडून रूपाली चाकणकर यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
सध्या सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलात जाण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









