अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास; बीडच्या ताडसोना येथे अंत्यसंस्कार….!

---Advertisement---

 

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंढे कुटुंबीयांसह प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आसराबाई मुंढे यांचे वय जवळपास शंभर वर्षांच्या आसपास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्या पार्थिवावर आज ३ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सध्या तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्तव्यावर कार्यरत होते. आईच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी तातडीने पुण्याकडे प्रस्थान केले. त्यानंतर पार्थिव ताडसोना येथे नेण्यात आले.

आसराबाई मुंढे यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या साधेपणाच्या आणि कष्टाळू स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, ताडसोना येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुकाराम मुंढे हे राज्यातील शिस्तप्रिय आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जाणारे अधिकारी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. गेल्या २१ वर्षांत त्यांची अनेक वेळा बदली झाली असून, सध्या ते राज्य शासनात सचिव म्हणून कार्यरत आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल आणि वन विभागाशी संबंधित कामकाज ते पाहत आहेत.

या दुःखद घटनेमुळे मुंढे कुटुंबावर शोककळा पसरली असून, विविध स्तरातून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---