Accident News : अतिघाई बेतली जीवावर, रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर

जळगाव : नंदुरबार येथून दोघे मित्र रेल्वे गाडीने जळगावला येत होते. गाडी आऊटरला थांबल्यामुळे ते दोघे जळगाव रेल्वे स्टेशनकडे पायी निघाले होते. याचवेळी जळगावला थांबा नसलेल्या तुलसी एक्स्प्रेसने या दोघांना जोरदार धडक दिली, यात  एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

राजकोट वरून आलेले दोघे मित्र नंदुरबारहून ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) व समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वग २२, रा. नंदुरबार) जळगाव येथे रेल्वेने आले होते. यावेळी सुरत येथून येणारी रेल्वे गाडी आऊटरला थोड्या वेळासाठी थांबली होती. गाडी आऊटरला जास्त वेळ थांबल्याने दोघांनी गाडीतून खाली उतरत पायीच जळगाव रेल्वे स्टेशन गाठण्याचे ठरविले. ते रुळावरुन जात असताना जळगावला थांबा नसलेली तुलसी एक्स्प्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. यातून ते दोघे रेल्वे रुळावरुन दूर फेकले गेले. यामध्ये ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वग २२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाल्याची रविवार १ डिसेंबर रोजी घडली आहे.

दरम्यान, हे दोघे मित्र त्यांच्या काही मित्रांसोबत नाशिकला फिरायला जाणार होते. मात्र त्यापुर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली. ओम व समर्थ या दोघांनी बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे या दोघांची त्यांच्या मित्रांसोबत भेटही होऊ शकली नाही. ओम आणि समर्थ हे दोघे जळगावला येत असतांना त्यांनी घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सेल्फी काढून तो मित्रांसोबत शेअर केला होता. मात्र,  या दुर्देवी घटनेमुळे ओमसाठी हा सेल्फी अखेरचा ठरल्याचे म्हणत त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले.