---Advertisement---
अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही उमटत असून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून मोठा गोंधळ झाला. विरोधकांनी पश्चिम आशियातील युद्धोत्तर परिस्थिती, ऊर्जा संकट आणि आखाती देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुब्रह्माण्यम जयशंकर यांनी प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत या विषयावर निवेदन केले. ते म्हणाले की, पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती भारतासाठी चिंतेची बाब आहे. आखाती देशांमध्ये सुमारे दहा लाख भारतीय राहतात व काम करतात, तर काही भारतीय शिक्षण आणि नोकरीसाठी इराणमध्ये आहेत. हा प्रदेश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
राज्यसभेत गोंधळ वाढल्याने विरोधकांनी सभात्याग केला. जयशंकर यांनी सांगितले की, सध्या इराणी नेतृत्वाशी संपर्क साधणे कठीण असले तरी भारत शांतता आणि संवादाच्या भूमिकेवर ठाम आहे.
दरम्यान, लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घालत परराष्ट्रमंत्र्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्याच्या मागणीवरूनही वातावरण तापले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत विरोधकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
दरम्यान काँग्रेस खासदार संयद नसीर हुसेन यांनी सरकारवर टीका करत, पश्चिम आशियातील संकट, ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न आणि भारतीयांच्या संरक्षणाबाबत संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.









