विशाल महाजन ( पारोळा प्रतिनिधी )
Padmalaya Temple : देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर. हे मंदिर महाभारत कालीन आहे. जळगाव जिल्ह्यातील एंरडोल तालुक्यात हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे एरंडोल तालुक्याची वेगळी ओळख देशभरात निर्माण झाली आहे.या धार्मिक स्थळाला दररोज हजारो भाविक भेट देतात. या मंदिराच्या धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे पर्यावरण विभागाचा सरोवर संवर्धन योजनेंतर्गत समावेश करत संवर्धन करण्यात येणार आहे.
या संदर्भात नुकतेच आ. अमोल पाटील यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेत मतदारसंघाचा महत्वपुर्ण विषयांबाबत चर्चा करून लेखी पत्रव्यवहार देखील केला. तसेच मतदारसंघातील मोठे पर्यटनस्थळ असलेले श्रीक्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे पर्यावरण विभागाचा सरोवर संवर्धन योजनेंतर्गत संवर्धन करण्यासंदर्भात चर्चा केली.
यावर मंत्री मुंडे सकारात्मकता दर्शवत श्रीक्षेत्र कमळ तलावासह मतदारसंघातील महत्वपुर्ण प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ठोस आश्वासित केले आहे. यामुळे कमळ तलावाच्या संवर्धनाला आता गती मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कमळ तलाव आकर्षणाचे केंद्र बिंदू
मंदिराचा परिसर घनदाट जंगल, जवळ असलेल्या तलाव, तलावातील विविध प्रकारचे रंगबिरंगी कमळाचे फुल हे भाविकांना आकर्षीत करतात. जळगाव पासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. गणपती मंदिर परिसराच्या चारही बाजूला घनदाट अरण्य असून विविध वन्य प्राण्यांचा संचार येथे नेहमी दिसत असतो. मंदिरासमोर भव्य तलाव असून तेथील विविध रंगाच्या कमळाच्या फुलांमुळे सौंदर्यात भर पडत असते. या तलावाचा विकास झाल्यास परिसराच्या सौंदर्यात भर पडत पर्यपर्यटनाला देखील चालना मिळेल.