गटनेता बदलाचा चेंडू विभागीय आयुक्तांनी टोलविला

---Advertisement---

 

शरद तायडेंचा स्विकृत नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा
तभा वृत्तसेवा
जळगाव, 27 मार्च


महापालिकेतील उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने घटनेनुसार गटनेता बदलून त्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले होते. विभागीय आयुक्तांनी हे पत्र दाखल करून घेत गटनेता बदलाचा चेंडू टोलविला आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांनी गटनेता बदलाची केवळ नोंद घेतल्याने महानगरप्रमुख शरद तायडे यांचा स्विकृत नगरसेवक पदाचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसत आहे.


महापालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीत उबाठाने नियुक्त केलेले गटनेता इब्राहीम पटेल यांनी स्विकृतसाठी नाव देतांना पक्षाच्या पदाधिकाऱ्याऐवजी दुसरेच नाव दिले. त्यामुळे पक्षीय पातळीवर इब्राहीम पटेल यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान या कृतीविरोधात उबाठाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी पक्षाच्या घटनेला अनुसरून अधिकारांचा वापर करीत इब्राहीम पटेल यांना गटनेते पदावरून दूर करून अर्शिनबानो शोएब खाटीक यांचे गटनेता पदासाठी नाव निश्चीत केले.

गटनेता बदलाबाबतच्या या प्रक्रियेसंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्रही दिले. त्यानंतर स्विकृतसाठी जिल्हाप्रमुखांनी उबाठाकडून महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नावाचा प्रस्ताव आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सादर केला. दरम्यान उबाठाकडून एकाच जागेसाठी दोन नावे आल्याने आयुक्तांनी प्रस्तावावरील निर्णय अधांतरीच ठेवला.


विभागीय आयुक्तांनीही चेंडू टोलविला
उबाठाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी गटनेता बदलाबाबत विभागीय आयुक्तांकडे पत्र दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी त्यावर पत्र देत गटनेता बदलाची केवळ नोंद घेण्यात आल्याचे नमूद करीत हा चेंडू टोलवून लावला. त्यामुळे पक्षाने घेतलेला गटनेता बदलाचा निर्णय कायम राहत असल्याने महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


महासभेत होणार घोषणा
स्विकृत नगरसेवक पदासाठी प्रस्ताव देण्यात आलेल्याच्या नावाची घोषणा 30 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महासभेत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---