---Advertisement---
जळगाव : जिल्हा पोलीस मुख्यालयाचे पद्मालय सभागृहात दिवाली सुफी नाईट या कार्यक्रमात कमरेला पिस्टल लावत गायकावर नोटांची उधळण करणाऱ्या पियूष मणियावर जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. दरम्यान या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील खान्देश टाइम्स न्यूज, महा पोलीस न्यूज आणि जळगाव मीडिया न्यूज यांच्यामार्फत दिपावलीनिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पद्मालय सभागृहात दिवाली सुफी नाईट कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे गायक शफीक मस्तान यांना बोलावण्यात आले होते. गायनाच्या कार्यक्रमादरम्यान पियूष मणियार याने कमरेला पिस्टल लावत गायक शफीक मस्तान यांच्यावर नोटांची उधळण केली. मागील एका महिला अधिकाऱ्याच्या प्रकरणातही पियूष मणियार याचे नाव चर्चेत होते. आता कमरेला पिस्टल लावून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा पध्दतीने नोटांची उधळण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सभागृहातच हा प्रकार घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेकडे पोलिसांचा कानाडोळा आहे की, काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला.
पोलिसांना आली जाग
नेहमीप्रमाणे घटना घडून गेल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागे होवून कामाला लागली. समाज माध्यमांवर व्हिडिओचित्रण प्रसारीत झाल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण करणाऱ्या पियुष मणियार विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोउनि गोपाल देशमुख हे करीत आहेत.
कार्यक्रमात पोलिसांचाही सहभाग?
दिवाली सुफी नाईट कार्यक्रमाला काही पोलिसांनी देखिल हजेरी लावली होती. त्यांच्या देखत हा प्रकार घडला असेल तर मग कार्यक्रमाला उपस्थिती देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होईल? याकडे लक्ष लागले आहे.









