प्लास्टिकमुक्त जळगावासाठी महापौरांचा नवा उपक्रम

---Advertisement---

 

शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून प्लास्टिकचा वापर कायमचा हद्दपार करण्यासाठी आता कापडी पिशव्यांच्या व्हेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस महापौर दिपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे. भाजीपाल्यासह प्रमुख मार्केटमध्ये अजूनही प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जात आहे.

शहरात ठिकठिकाणी कारवाई करूनही प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने महापौरांनी हा पर्याय समोर आणला आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरांतील प्रमुख ५ ते ६ बाजारपेठांमध्ये ही मशिनरी बसवण्यात येणार आहे. यासाठी महापौरांनी मार्केटचे सर्वेक्षण करून जागा निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

१० रुपयांत पिशवी, एका मशिनमध्ये दोनशेची क्षमता…
नागरिकांना या मशीनमध्ये फक्त १० रुपयांचा कॉईन टाकावा लागेल, ज्या बदल्यात त्यांना दर्जेदार कापडी पिशवी उपलब्ध होईल. एका मशीनमध्ये सुमारे २०० पिशव्या ठेवण्याची क्षमता असेल. सुरुवातीला संबंधित कंपनीकडून पिशव्या पुरवल्या जातील, मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या महिला बचत गटांकडून या पिशव्या तयार करून घेतल्या जातील. यामुळे प्लास्टिकमुक्तीसोबतच स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. महापौर या मशीनच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची आणि संबंधित कंपन्यांची माहिती घेत आहे. लवकरच जळगावकरांना बाजारहाट करताना प्लास्टिकला बाय-बाय करून कापडी पिशवीचा सन्मानाने वापर करता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---