Jalgaon News: चोरलेल्या दुचाकीवर स्वत:ची ओळख लपवून फिरणाऱ्या एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने तपास चक्र फिरवून कल्याण होळ (ता.धरणगाव) येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल चार दुचाकी असा सुमारे 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वाहन चोरीतील संशयितांचा शोध घेऊन कारवाई करा, असे निर्देश एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यानुसार त्यांच्या पथकाने तपासाला वेग देत कारवाई केली. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याण होळ) असे संशयिताचे नाव आहे. तो स्वत:ची ओळख लपवून चोरीच्या दुचाकीवर फिरत पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या बद्दल गोपनीय माहिती प्राप्त होताच पथकाने कल्याण होळ गाठत त्याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार गोपाल सुरेश भिल (वय 22, रा. वराड ता.चोपडा) यालाही ताब्यात घेतले. करण याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. चोपडा ग्रामीण एक, चोपडा शहर हद्दीतून दोन दुचाकी त्याने चोरी केल्याची कबुली दिली. अन्य एक दुचाकी कोठुन चोरली होती, याचा शोध पथक घेत आहे.