Jalgaon Crime News : आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला लुटणारे २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : तालुक्यातील भादली गावात ९ डिसेंबर रोजी एका व्यापाऱ्याला लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा छडा लावून पाचही हल्लेखोरांना अटक केली आहे.

आंध्र प्रदेशातील दुर्गावेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा (वय-४१, रा. भेदा पांडू मंडल, वेस्ट गोदावरी आंध्र प्रदेश) हे कॉपर तारांचे भंगार खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात. या व्यापाऱ्याला कॉपर तारांचे भंगार खरेदी करण्यासाठी पाच जणांनी जळगावला बोलवले होते. व्यापारी सकाळी नऊ वाजता जळगावात पोहचले. त्यानंतर रिक्षाने भादली गाव गाठत चहाच्या टपरीवर थांबले. यावेळी व्यापाऱ्याने मोबाइलधारकाशी संपर्क केला. यानंतर मोबाइलधारकाने चहा टपरीवाल्याशी फोनद्वारे बोलणे केले. यानुसार चहा टपरीवाल्याने व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून गावाच्या बाहेर असलेल्या पाठचारी जवळील पंप हाऊस येथे नेले. त्याला एक चहा टपरीवाला आणि चार इतर व्यक्तींच्या सहाय्याने एका पंप हाऊसवर नेले. तेथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला, आणि त्याच्या जवळील सोन्याची साखळी, मोबाईल व महागडी घड्याळ जबरदस्तीने हिसकावले. तसेच, व्यापाऱ्याच्या फोनपेवरून ९० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

हा प्रकार घडल्यानंतर व्यापाऱ्याने १० डिसेंबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली, आणि पोलिसांनी तपास करून २४ तासांच्या आत हल्लेखोरांना अटक केली. अटकेत असलेल्या पाच आरोपींची नावे प्रद्यूम्न गुलाब पवार वय-२२, अमजीत भास्कर भोसले वय ३५, पप्पू गुलाब पवार वय २३, सोन्या उर्फ सोना गुलाब पवार वय २८, क्रीश उर्फ किरेश रफिक पवार वय २४ सर्व रा. हलखेडा ता.मुक्ताईनगरअशी आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.