---Advertisement---
पाळधी पोलीसांनी वीजतार चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे. धरणगाव तालुका अंतर्गत वराड येथे बंद पडलेल्या सोलर प्लांटवरील वीजतारा चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, महामार्गालगत एकलग्न गावाजवळ पोखरी रस्त्यावरून संशयित चारचाकी वाहन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने पाठलाग करून बोलेरो पिकअप (क्रमांक MH 04 GF 4172) अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वीजतारांचे बंडल आढळून आले. यावेळी अजय बापू गायकवाड याच्यासह दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली.
पोलिस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी सहा साथीदार असल्याचे सांगितले आहे. तसेच चोपडा व अडावद परिसरातही चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. या प्रकरणी अजय गायकवाड याला अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पो.नि. सुनील पवार, स.पो.नि. प्रशांत कंडारे, पो.उप.नि. दत्तात्रय बडगुजर आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.









