जळगाव : नवापूर येथील तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यासाठी तीन लाखांची लाच तडजोडीअंती स्वीकारताना जळगाव येथील प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह खासगी पंटर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकला. दीपक अण्णा पाटील (वय ५६) असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे, तर भिकन मुकुंद भावे (वय ५२, रा. आदर्शनगर, जळगाव) असे खासगी पंटरचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
५५ वर्षीय तक्रारदार हे आरटीओ अधिकारी असून, त्यांची नोव्हेंबरमध्ये नवापूर येथील तपासणी नाक्यावर बदली करण्यात आल्यानंतर, त्या मोबदल्यात येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे नावाच्या खासगी पंटरच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यासाठी खासगी पंटर भिकन मुकुंद भावेंनी निरोप दिला होता. मात्र, लाच द्यावयाची नसल्याने अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार केली. त्यानंतर लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (५ डिसेंबर) सापळा रचला. दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदाराच्या जळगाव शहरातील मेहरुण तलावाजवळील लेक अपार्टमेंटमधील राहत्या घरात भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि तेथेच त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. खासगी पंटर भिकन भावे यांनी सांगितल्यानुसार, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनात हवालदार अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण सचिन बारसे, सी.एन. बागुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला दरम्यान, बड्या अधिकाऱ्याच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झडतीही पथक घेत असल्याचे समजते.