अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी

जळगाव  : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. पंचनामे करून बरेच दिवस झाले परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आधीच खरीप हगामातील अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न आधीच कमी आले आणि त्याही मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेता येईल या आशेवर असलेला शेतकरी मात्र परत अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे.

आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला केळी व इतर पिकाला फटका बसला आहे. तरी  शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील ,तालुका संघटक विलास सोनार, संदीप मांडोळे, शहर सचिव हर्षल वाणी  ,देवेंद्र माळी, तालुका सचिव मनोज लोहार आदींची स्वाक्षरी आहे.