---Advertisement---
जळगाव : ६ महिन्यांपासून चुकीची वीज बिले; पूर्वसूचना न देता सुमारे १०० कनेक्शन खंडित
सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना गेल्या सहा महिन्यांपासून चुकीची वीज बिले दिली जात असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. थकबाकीच्या नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे सुमारे १०० ग्राहकांचा वीजपुरवठा आपोआप खंडित करण्यात आल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या कारवाईमुळे काही सरकारी वसतिगृहे, रुग्णालये तसेच शेकडो घरे अंधारात गेली. सौर प्रकल्प बसवूनही जादा बिलांचा भुर्दंड बसत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. “नेट मीटरिंगचा योग्य हिशोब न लावता मनमानी बिले पाठवली जात आहेत. दुरुस्तीच्या वारंवार मागण्या करूनही प्रतिसाद मिळत नाही,” असा आरोप ग्राहकांनी केला.
स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे थेट वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषतः रुग्णालये आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांवर याचा परिणाम झाल्याने प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला.
कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करण्याची आणि चुकीची बिले रद्द करून योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तक्रारींची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, नागरिकांकडून ठोस निर्णय आणि लेखी आश्वासनाची मागणी करण्यात येत आहे.









