जिल्ह्यात हमी दरात सोयाबीनची खरेदी

जळगाव : जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर उडीद, मूग तसेच सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात हमीभाव योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोयाबीनचे दरदेखील चढ्या प्रतीचे असून खुल्या बाजारात ते सुमारे तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयांदरम्यान आहेत. तर शासनांतर्गत हमीभाव ४,८९२ रु. असून बाजारभावापेक्षा हे दर ११०० रुपयांनी अधिक आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांची परवड थांबवण्यासाठी सोयाबीनसह अन्य शेतीउत्पादन मालाची हमीभाव खरेदी अंतर्गत नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. हमी केंद्रात सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रती क्विंटल दर निर्धारित केला आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रात सोयाबीनला १ हजार १०० रुपये अधिक दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन हातभार लावणारा दर आहे.

शेतकऱ्यांना येणार मोवाईलवर मेसेज
यात यावल येथे कोरपावली वि.का. सोसा. अंतर्गत सोमवार, ११ नोव्हेंबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे. हमीभाव खरेदी योजनेंतर्गत केंद्रांवर सोयाबीन खरेदीला सुरुवात झात्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी गर्दी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी मेसेज पाठविले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला, अशाच शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी आणता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी परवड थांबणार आहे.

सोयाबीनसाठी ८५६ शेतकऱ्यांची नोंदणी
जिल्हा विपणन विभागातर्फे शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर सोयाबीनसाठी सर्वात जास्त ८५६, मुगासाठी २४, तर उडीदसाठी १० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सोयाबीन ४ हजार ८९२, मूग ८ हजार ६८२, तर उडीद ७ हजार ४०० रुपये असे हमीदर आहेत.

१६ हमी केंद्रांवर होणार खरेदी
जिल्ह्यात उडीद, मूग तसेच सोयाबीन खरेदीसाठी १६ केंद्रांना शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. यात अमळनेर- एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ, पारोळा, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर, पाचोरा, भडगाव, आणि चाळीसगाव तालुका शेतकरी सहकारी संघ. धरणगाव एरंडोल शेतकरी सहकारी संघ, कासोदा अण्णासाो. साहेबराव पाटील फूटसेल सोसायटी, पाळधी, ता. एरंडोल, म्हसावद जळगाव तालुका शेतकरी सहकारी संघ, जळगाव जळगाव जिल्हा कृषी औ. सर्व सेवा संघ मर्या., यावल कोरपावली वि.का.सो., बोदवड को-ऑप. पस्वेस अॅण्ड सेल युनियन लि., अशा १६ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.


१२ टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनची होणार खरेदी
सोयाबीनची खरेदी करताना चांगल्या प्रकारचे सोयाबीन असणे गरजेचे आहे. कोणताही काडी, कचरा नसावा, अशी अट असून हमी केंद्रावर सोयाबीनला चाळणी केली जाईल. सोयाबीन खरेदीसाठी आर्द्रता/ओलावा तपासणाऱ्या मशीनद्वारे तपासणी केली जाईल. यात १२ टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी केली जाईल. जास्त आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी आणू नये, यासाठी नमुना तपासणी केल्यानंतरच सोयाबीन खरेदी केले जाणार आहे.
सुनील मेने, जिल्हा विपणन अधिकारी, जळगाव