जळगाव : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच तत्पर आहे. या दृष्टीने आदिवासी विकास प्रशासनाने नवी दिल्लीतील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत ‘गुरूशाला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आहे.
राज्यात ‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत सन 2024-25 ते 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात आदिवासी विकास विभाग 497 शासकीय आश्रमशाळा चालवितो, ज्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘गुरूशाला’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर मूल्यमापन करून विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. या उपक्रमासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत 3 वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी तीन टप्प्यात केली जाईल. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल, दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षक-अधिक्षिकांना प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणांमुळे शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेचे आधुनिकीकरण होईल.
‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत आदर्श शाळा स्पर्धेचे आयोजन केले गेले होते, ज्यामध्ये 497 प्रकल्प सादर केले गेले. या उपक्रमांतगर्त आश्रमशाळा शिक्षकांना प्रोत्सहान देण्यात येणार आहे. यातील 287 प्रकल्प पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. यात नाशिक, ठाणे, नागपूर, आणि अमरावती आयुक्तालयातील प्रकल्पांचा समावेश आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यानुसार, ‘गुरूशाला’मुळे शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रक्रियेत सुधारणा होईल आणि आश्रमशाळांचा शैक्षणिक गुणवत्ता स्तर उंचावेल.