जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठानातर्फे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील रंगतरंग या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या संत परंपरेचा अनुभव या कार्यक्रमातून मिळणार आहे. यानिमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित एक नेत्रदीपक संत परंपरेचा कालखंड सागर पार्क मैदान येथे अनुभवास मिळत आहे.
संत परंपरा या चार दिवसीय महानाट्यातील पहिले पुष्प आज गुरुवार 9 जानेवारी रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) सादरकर्ते कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय यांनी गुंफले. या नृत्य व नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 700 विद्यार्थ्यांचा सहभाग या महानाट्यात आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर(जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष), डाॅ. विवेक जोशी (केशव स्मृती प्रतिष्ठान प्रकल्प प्रमुख सेवा वस्ती विभाग तसेच माजी विद्यार्थी दर्शन फालक(आर्किटेक्ट) तसेच विवेकानंद प्रतिष्ठान उपाध्यक्षा हेमाताई अमळकर, शानभाग विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, शानभाग विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख स्वप्निल पाटील, रुपाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन सुर्यकांत पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार अनुराधा देशमुख यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पारिवारिक जीवन या प्रसंगाने करण्यात आली. त्यानंतर इंद्रायणीत कर्जखत बुडवणे, गावात याचना, शेतराखण, वृक्षतोड प्रसंग,आवली तुकोबा शोध, संवेदनशील तुकोबा, मंबाजी प्रसंग आदी प्रसंग नाट्य रूपाने सदर करण्यात आले.
तसेच सुंदर ते ध्यान, छुन्नुक छुन्नुक, गोंधळ, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, टाळ बोले चिपळीला, भारुड, भेटी लागे जीवा, पोवाडा, संतकृपा झाली अशा एकापेक्षा एक सुरेल आणि सरस गीतां वरील नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. तत्पूर्वी महानाट्याचे संवाद, सुत्रसंचालन माध्यमिक विभागातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना सुरेखा शिवरामे-बाणाईत आणि अनुराधा देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तर वाद्यवृंदामध्ये गायन वादन हे एकूण 55 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना संगीत शिक्षिक वरूण नेवे, नकुल सोनवणे, उमेश सूर्यवंशी आणि दर्शन गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण महानाट्य मध्ये एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानमधील सर्व प्रमुख, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.