Raver Crime News: रावेर पोलिसांनी रोखली गुरांची अवैध वाहतूक

रावेर : रावेर तालुक्यातील पाल येथील शेरी नाक्यावर अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना रावेर पोलिसांनी ताब्यात घेत त्यातून ३३ म्हशींची सुटका केली. कत्तलीच्या उद्देशाने या गुरांची वाहतूक होत असल्याचा संशय आहे. तब्बल ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालकांना अटक करण्यात आली.

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यांतर्गत मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शेरीनाका येथे नाकाबंदी करण्यात आली. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चार वाहनांद्वारे म्हशींची निर्दयीपणे वाहतूक होत असताना रावेर पोलिसांनी ३३ म्हशींची सुटका करीत चार वाहनांसह एकूण ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आयशर (क्रमांक एच.१८ बी. झेड. ७४५५), अशोक लेलँड (एम.एच.१८ बी.जी ८९३६), (एम. एच.१८ बी.जी. ३८२३), (एम. पी.०९ डी.जी. ६६४४) या चारही वाहनांमध्ये निर्दयीपणे म्हशींना कोंबून नेण्यात येत असल्याने उपनिरीक्षक तुषार पाटील व सहकाऱ्यांनी वाहने ताब्यात घेत त्यातील चालक ईरफान खान हिरू खान मेवाती (सारपाटा, ता. अंमळनेर), ईनायत खान काल्या खान (बनखड, ता. कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश), राजू खॉ सलीम खाँ (ताजपूर, ता. जि.उज्जैन, मध्यप्रदेश), अली खान शरीफ खान (पालसमद, ता. कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले.

म्हशी खरेदी केल्याबाबतचे कागदपत्र तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र, वाहतूक परवाना याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आरोपींनी सांगितल्यावर आरोपींविरोधात हमीद तडवी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशू क्रुरता अधिनियम कलम ११ चे (१) (ड) (ट) प्राण्यांचे वाहतूक अधिनियमानुसार कलम ४७,४८,४९ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११९, मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार जगदीश पाटील, पोलीस कर्मचारी ईश्वर चव्हाण, हमीद तडवी आदींच्या पथकाने केली.