---Advertisement---
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक कामगार नेते आणि कुशल संघटक गजानन राणे यांची जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राणे आता जिल्ह्यात पक्षविस्ताराची धुरा सांभाळणार आहेत.
या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गजानन राणे यांनी यापूर्वी २०१३ साली देखील हे पद समर्थपणे भूषवले होते. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, स्थानिक राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जुने संबंध लक्षात घेता पक्ष नेतृत्वाने त्यांच्या अनुभवावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
कामगारांच्या हक्कासाठी लढणारे आक्रमक नेतृत्व म्हणून राणे यांची ओळख असून, विविध कंपन्यांमधील कामगारांवरील अन्यायाविरोधात त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील प्रश्न सोडवताना त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
स्पष्टवक्तेपणा, प्रभावी संघटन कौशल्य आणि माणसं जोडण्याची हातोटी ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत नव्या पिढीला संधी देण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे.
दरम्यान, या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात मनसेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनीही राणेंच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे सांगितले.









