महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका सुरूच; वसईत अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती, अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार…!

---Advertisement---

 

महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरण अजून ताजं असतानाच आता मुंबईजवळील वसई परिसरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण केलं जात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

वसईतील स्वतःला धर्मगुरू म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने ३५ वर्षीय महिलेला आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बहाण्याने जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची आणि पीडित महिलेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. महिला धार्मिक वृत्तीची असल्याने आरोपीने तिचा विश्वास जिंकत तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. हळूहळू त्याने तिच्यावर मानसिक प्रभाव निर्माण करत स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे भासवले.

डिसेंबर २०२३ मध्ये आरोपी महिलेच्या संपर्कात येत तिला भेटण्यासाठी पुण्यात गेला. तिथे त्याने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगितले आणि महिलेला पार्वती असल्याचे पटवून दिले. या खोट्या आणि भ्रामक गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडत त्याने महिलेचा गैरफायदा घेतला.

यानंतर आरोपीने महिलेला पुण्यातील एका लॉजवर नेले. तिथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर या दरम्यान त्याने तिचे अश्लील फोटोही काढल्याचं समोर आलं आहे. पुढे या फोटोच्या आधारे आरोपीने महिलेला धमकावत राहून तिच्यावर दबाव टाकल्याचेही उघड झाले आहे.

काही काळानंतर आरोपीने पुन्हा महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मुख्य घटना पुणे परिसरात घडल्याने तपास त्या भागातील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपीच्या कृत्यांची सखोल चौकशी केली जात असून, अशा प्रकारच्या भोंदूगिरीविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, राज्यात यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजात जागरूकता वाढवण्याची आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---