---Advertisement---
जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नसून नरबळीचा संशय व्यक्त करीत आज शुक्रवारी (२७ जून) रोजी रिंगणगाव व परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रोष व्यक्त केला. अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, नरबळीचे कलम लावावे, तपास सीआयडीकडे सोपवावा अशा मागण्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनासमोर मांडल्या.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयावर ग्रामस्थांद्वारे मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. स्मिता वाघ देखील उपस्थित होत्या. तेजस महाजन (वय १३) याचा मृतदेह रिंगणगाव-खर्चे रस्त्यालगतच्या एका पडक्या शेतात काटेरी झुडपात आढळून आला होता. संशयित आरोपीने तेजसवर कोठेही वार न करता केवळ गळ्यातील कंठ काढून घेतला. त्यामुळे हा नरबळी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तेजसच्या वडिलांना १२ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांत अधिक शोककळा पसरली. या हत्येला नरबळीचा संदर्भ असल्याचा संशय स्थानिकांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिस नरबळीच्या शक्यतेला महत्त्व देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नरबळी विरोधात ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर केवळ मर्यादित लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात आल्याने ग्रामस्थांनी बाहेरच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे स्वतः बाहेर येत उपस्थित होत त्यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.