---Advertisement---
पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता भारतातील शेती क्षेत्रावर उमटण्याची शक्यता आहे. युद्धामुळे लिक्विड नॅचरल गॅस (LNG) पुरवठा विस्कळीत होत असून, त्याचा थेट परिणाम युरिया खत उत्पादनावर होत आहे.
भारतामध्ये युरिया खतासाठी मोठ्या प्रमाणावर LNG वर अवलंबून राहावे लागते. देशातील 18 हून अधिक खत उत्पादक कंपन्या आखाती देश व रशिया येथून गॅस किंवा तयार युरिया आयात करतात. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे समुद्री वाहतूक अडथळ्यांत आली असून LNG चे दर झपाट्याने वाढले आहेत. परिणामी खत प्रकल्पांना आवश्यक गॅस पुरवठा कमी होत आहे आणि उत्पादनाचा वेग मंदावला आहे.
याचा थेट परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युरिया हे खरीप पिकांसाठी अत्यावश्यक खत असल्याने त्याची टंचाई निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच बाजारात खतांच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कलंत्री यांनी या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम होत असून, केंद्र सरकारने तातडीने पर्यायी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.









